सांगली: अपंग चिमुरडीचा बापानेच घेतला जीव

 कुरळप : सांभाळ करायला जमत नसल्यामुळे जन्मदात्या बापानेच चार वर्षांच्या अपंग मुलीचा विहिरीत ढकलून खून केला. कुरळप (ता. वाळवा) येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली.

श्रीदेवी अण्णाप्पा कोळी असे मृत चिमुरडीचे नाव आहे. वडील अण्णापा तुकाराम कोळी (27 , सध्या रा. कुरळप, मूळ रा. खुपशिंगी, जि सोलापूर) या संशयिताला अटक केली आहे. भीमराव तुकाराम कोळी
(रा. कुरळप) यांनी फिर्याद दिली.

कुरळप येथे काही वर्षांपासून अण्णाप्पा हा पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास आहे. त्याची मोठी मुलगी श्रीदेवी चार वर्षाची तर छोटी मुलगी दोन वर्षाची. अण्णाप्पाला दारूचे व्यसन आहे. दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी घरातून छोट्या मुलीला घेऊन निघून गेली होती. मंगळवारी अण्णाप्पा कामावर गेला होता. रात्री तो घरी आल्यानंतर त्याने श्रीदेवीला खाऊ आणण्यासाठी घराबाहेर घेऊन गेला होता. रात्री तो घरी परत आला. त्यावेळी त्याच्याजवळ मुलगी नसल्याने त्याच्या नात्यातील लोकांनी त्याच्याकडे मुलीबाबत विचारणा केली. यावेळी त्याने मुलीस कुरळप-येलूर रस्त्यावरील विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले.

घरातील लोकांनी याबाबतची माहिती कुरळप पोलिसांना दिली. पोलिस उपअधीक्षक पद्मा कदम यांच्यासह सहकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली. पहाटे तीनपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. परंतु रात्रीची वेळ असल्याने विहिरीत मृतदेह शोधायला अडथळे येत होते. विहिरीतील पाण्याचा रात्रभर उपसा करण्यात आला. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास पोलिसांना मृतदेह पाण्यावरती तरंगताना दिसला. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments