' मम्मीपप्पा माफ करा , जगून जास्त त्रास होईल ' ; प्रेमविवाह केलेल्या डॉक्टर तरुणीची आत्महत्या

 

औरंगाबाद : तीन महिन्यांपुर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या डॉक्टर महिलेने अभियंता पतीच्या त्रासाला कंटाळुन पाच दिवसांपूर्वी रक्तवाहिनीत इन्सुलीनचे इजेक्शन घेतले होते.

तेव्हापासून बेशुद्ध असलेल्या डॉक्टरवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी (दि.९) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातारा पतीसह, सासू-सासरा, दीराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. दरम्यान, विवाहितेच्या खोलीत पाच पनांची सुसाईड नोटही सापडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. वर्षा अंबादास व्यवहारे (२५) आणि अभियंता धनंजय वसंत डोंगरे (रा. सावरगांव पोखरी, ता. गेवराई, जि. बीड, ह.मु.सरोदे कॉलनी, हमालवाडा, रेल्वेस्टेशन) या दोघांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी २ मे २०२२ रोजी आळंदी येथील रिध्दी सिद्धी मंगल कार्यालयात मुलाच्या कुटुंबाच्या विरोधामुळे प्रेमविवाह केला. धनंजय हा पैठण येथील फुड कंपनीत तर डॉ. वर्षा या शहरातील खाजगी दवाखान्यात नोकरी करीत होत्या. लग्नानंतर धनंजय यास डॉ. वर्षाच्या कुटुंबियांनी स्विकारले. मात्र डॉ. वर्षा यांना पतीसह सासू सिंधुबाई, सासरा वसंत डोंगरे आणि दीर बप्पा यांनी काही दिवसात त्रास देण्यास सुरुवात केली.

आमच्या जातीतील नसल्यामुळे धनंजयचे दुसरे लग्न करुन द्यायचे असून, तु त्याला सोडून दे म्हणून डॉ. वर्षाला त्रास देऊ लागले. जात आणि गर्भवती राहिल्याने सासू सतत मारीत होती. एक लाख रुपये घेऊन धनंजयला सोडून देण्याची मागणीही करीत असल्यामुळे डॉ. वर्षा यांनी ३० जुलै रोजी महिला तक्रार निवारण केंद्रात याविषयी नोंदवली. तसेच धनंजय सतत मारहाण करीत असल्यामुळे त्याच्या विरोधात क्रांतीचौक ठाण्यात अदखलपात्र गुन्हा वर्षाने नोंदवला. ३ ऑगस्टला रात्री पतीसोबत भांडण झाल्यामुळे डॉ. वर्षा यांनी खोलीचा दरवाजा बंद करुन २ हजार मी.मी. एवढे इन्सुलीनचे औषध रक्तवाहिनीमध्ये इजेक्शनने घेतले. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. डॉ. वर्षा यांच्या बहिणीला पतीनेच फोनवरुन ती फोन उचलत नसल्याचे सांगितले. नातेवाईकांनी फोन केले.

मात्र, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते बीडहून औरंगाबादला पहाटे आले. त्यांनी डॉ. वर्षा यांना खाजगी दवाखान्यात ४ ऑगस्टच्या पहाटे साडेपाच वाजता दाखल केले. तेव्हापासून डॉ. वर्षा शुद्धीवर आल्याच नाहीत. खाजगी रुग्णालयातील खर्च आई-वडिलांना झेपत नसल्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात हालवले. घाटीत उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी वर्षा यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन सातारा ठाण्यात गुन्हा नोंदवला. अधिक तपास उपनिरीक्षक सर्जेराव सानप करीत आहेत.

पाच पानांची सुसाईड नोट
डॉ. वर्षा यांनी इन्सुलीनचे इजेक्शन घेण्यापुर्वी पाच पानांची सुसाईड नोट लिहुन ठेवली आहे. त्यामध्ये माझ्या मृत्यूला पती धनंजय, सासु सिंधु, सासरा वसंत, दीर बप्पा हेच जबाबदार असतील. पतीने प्रेमाच्या नावाखाली फसवल्याचे लिहिले आहे. लग्नानंतर कशापद्धतीने सासरच्या लोकांकडुन छळ करण्यात येत होता. त्यावरही प्रकाश टाकला आहे. त्याशिवाय मोबाईलचा लॉक नंबर, कोणाला किती पैसे दिले. एफडी केली. त्याविषयीचे नंबर, बँक अकाऊंटचे पासवर्डही नोटमध्ये लिहुन ठेवत पैसे आई-वडिलांना द्यावे असेही म्हटले आहे.

मम्मी-पप्पा प्लीझ माफ करा
''मम्मी पप्पा मला माफ करा. माझ त्याच्यावर प्रेम होत. पण तुमच्यापेक्षा जास्त नव्हत. मी त्याला लग्नाला नाही म्हणत होते पण त्याने मला धमकी देऊन बोलावुन घेतल. तो फसवत गेला आणि मी फसत गेले. आता सुद्धा माझी इच्छा नव्हती मरायची पण मी जे काई केले त्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला आणि आता मला एकटी समाजाला सामोर जायला त्रास होयलाय. तुम्हाला मी इथुन पुढे पण त्रास दिला असता तुमच्यावर माझी जबाबदारी पडली असती. मी मेल्याच्या त्रासातुन तुम्ही बाहेर पडताल पण मी जगले असते तर तुम्हाला जास्त त्रास झाला असता.''
- तुमचीच डॉ. वर्षा.


सोर्स: लोकमत

Post a Comment

0 Comments