धक्कादायक: दागिन्यांसाठी चोरटयांनी केली वृध्द महिलेची हत्या

 


रायगड: रायगड जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये दागिन्यांसाठी 69 वर्षीय वृद्ध महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे.

माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी येथे ही घटना घडली आहे. मृत महिला ही मुंबईहून महाशिवरात्रीनिमित्त गावी आली होती. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रायगड पोलिसांनी या खुनाच्या तपासाची सूत्रे वेगाने सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील तीन संशयीतांना ताब्यातही घेतले आहे. 

माणगाव म्हसेवाडी येथील रहिवासी विनोद श्रीरंग सावंत यांच्या घरी त्यांच्या आई संगीता सावंत या एकट्याच घरी असल्याचे पाहून काही अज्ञात व्यक्तीनी त्यांच्या घरात शिरून बळजबरीने त्यांना बाथरूम मध्ये घेऊन जाऊन पाण्याने भरलेल्या बादलीत त्यांचे तोंड बुडवून त्यांचा जीव घेतला.
त्यानंतर त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या,
कानातील सोन्याच्या कुड्या असा एकूण सुमारे तीन लाखांचा ऐवज घेऊन चोरटे फरार झाले आहेत.

संशयित म्हणून पकडलेले तिन्ही गुन्हेगारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची माहिती
पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या सगळ्या घटनेची माहिती
मिळताच रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे ,
पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील,
माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेची तपासणी केली.
हा खून एखाद्या माहितीतल्या व्यक्तीने केला असावा असा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आणि तीन संशयीतांना ताब्यात घेतले. सध्या या संशयितांची कसून चौकशी सुरु आहे.


Post a Comment

0 Comments