लग्नाचा खोटा बनाव करत युवकाची फसवणुक

 


मंचर -लग्नाचा खोटा बनाव करून युवकाची फसवणूक करत त्याच्या घरातील दागिने व पैसे घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असणारी विवाहित महिला आणि तिचा मुलगा, एक साथीदार अशा तिघांना पारगाव पोलिसांनी मंचर येथे अटक केली आहे.

याबरोबरच इतर तीन आरोपींचा शोध पारगाव पोलीस घेत आहेत.

याप्रकरणी लता अविनाश कोटलवार (वय 51, रा. शिरवळ, पुणे), मनोज अविनाश कोटलवार (वय 24, दोघेही रा. सध्या आळंदी, ता. खेड, मूळ रा. दत्तनगर, नांदेड), यास्मिन अन्वर बेग (वय 27, रा. शिवाजीनगर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश खंडू बांगर (वय 29, रा. भराडी, ता. आंबेगाव) याच्यासाठी वसंत किसन थोरात (रा. मंचर, ता. आंबेगाव) यांना मुलीचे स्थळ आणले होते.

त्यांच्याबरोबर गणपत हाबू वाळुंज (रा. वेताळे, ता. आंबेगाव) मुलगी शितल रमेश खुडे (रा. पूर्णा, जि. नांदेड), मुलीचे मावशी लता अविनाश कोटलवार, मध्यस्थी वैशाली मोरे (रा. पुणे) हे आले होते. मात्र, बैठकीतच हे लग्न त्याच दिवशी करण्याचे ठरवून बांगर कुटुंबीयांना 1 लाख 30 हजार देण्याचे कबूल केले होते आणि घरातच हार घालून विवाह लावण्यात आला.

दुसऱ्या दिवशी बांगर कुटुबियांनी ठरलेले 1 लाख 30 हजार रुपये रक्कम दिल्यानंतर मंचर येथे रजिस्टर विवाह करण्यात आला. मात्र, त्यानंतर गणेशला पत्नी शितल हिच्या वागण्यात फरक जाणवू लागला. त्याने तिच्यावर लक्ष ठेवले असता तिचा पहिले लग्न झाले असून तिला मुले असून,

पैसे आणि दागिने घेऊन ती पळून जाणार असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने पारगाव पोलीस ठाण्यात जाऊन फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी लता कोटलवार, शितल रमेश खुडे (रा. पूर्णा, जि. नांदेड), वसंत थोरात, गणपत वाळुंज, वैशाली मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला करून पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीषक लहु थाटे यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे.


Post a Comment

0 Comments