तालुक्यातील माढा येथे तीन वर्षाच्या मुलीला कारमध्ये टाकून पळवून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासात अपहृत मुलीची सुटका केली.
पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे. श्रीकांत शेवाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी श्रीकांतने गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे. माढा पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
माढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेगाव (ता. माढा) येथे राहणाऱ्या मीनल अहिरे यांच्या तीन वर्षाच्या मुलीचे मानेगाव येथील हॉटेल आरोही येथून गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता अपहरण करण्यात आले. अहिरे या मूळच्या साक्री (जि. धुळे) येथील रहिवासी असून सध्या माढा येथे राहत आहेत.
श्रीकांत शेवाळे याने मुलीला जबरदस्तीने उचलून कारमधे टाकून पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत मुलीची आई मीनल यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देखील दिली.
0 Comments