पतीच्या मृत्यूनंतर काही क्षणात पत्नीनेही सोडला जीव

 


प्रेमात अनेकजण एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. पण फार कमी लोक ते शेवटपर्यंत निभावू शकतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. एका जोडप्याने आयुष्यभर एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे.

पतीच्या मृत्यूनंतर काही क्षणात पत्नीनेही जीव सोडला. त्यामुळे एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी देण्यात आला आहे.

ग्वाल्हेरच्या रमेश खाटिक आणि चतरो देवी यांची ही गोष्ट आहे. 70 वर्षीय रमेश खाटिक यांचे निधन झाले. हे पाहून काही क्षणातच त्यांची पत्नी चतरो देवी यांचाही मृत्यू झाला. पती-पत्नी दोघेही ५० वर्षे सावलीसारखे एकमेकांसोबत राहिले आणि दोघांचा मृत्यूही एकाचवेळी आला. दोघांचा शेवटचा प्रवास एकाच दिवशी झाला आणि दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.

भितरवार येथील चिटोली येथे राहणारे रमेश चंद्र खाटिक (७०) यांनी रात्री ६८ वर्षीय पत्नी चतरो देवीसोबत जेवण केलं. जेवण करून दोघेही झोपी गेले. रात्री रमेशचंद्र बाथरूमला जाण्यासाठी उठले. यादरम्यान ते अचानक खाली पडले आणि मृत्यू झाला. काही वेळाने पत्नी चतरोबाई यांना जाग आली असता त्यांनी पती मृतावस्थेत असल्याचे पाहिले. ते पाहून त्यांचाही मृत्यू झाला. सकाळी घरच्यांना जाग आली तेव्हा हे समोर आलं. कुटुंबीयांनी डॉक्टरांना फोन केला असता दोघांचा मृत्यू झाला होता.

रमेश चंद्र आणि चतरो देवी यांचा विवाह ५० वर्षांपूर्वी झाला होता आणि जेव्हा जगाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा दोघेही एकत्र निघून गेले. सात फेरे घेत असताना एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ खर्‍या अर्थाने चतरो देवी यांनी पूर्ण केली, असेही लोकांनी सांगितले. स्मशानभूमीत एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश चंद्र खाटिक आपल्या गावात रमेश नेताजी म्हणून प्रसिद्ध होते.


Post a Comment

0 Comments