तीन चोऱ्या, तीन घरफोड्या शहरात चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना

 


शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सातत्याने सुरूच आहे. शहरात विविध पोलिस ठाण्यांतर्गत तीन जबरी चोरीचे तर तीन घरफोड्यांचे गुन्हे समोर आले आहेत.

पेठेतील बसस्टॉपवर बसची वाट पाहत असलेल्या रवी मुर्गेशन चिट्टीयार (वय 47, रा. ज्योती इम बंगलो, गुलमोहर अपार्टमें समोर, दौंड) यांचा मोबाईल चोरट्यांनी जबरी चोरी करून नेला. हा प्रकार 26 डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडला.

दुसर्‍या घटनेत एक जण पुणे स्टेशनवरून अलंकार सिनेमा चौकात जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी पाळत ठेवून त्याच्या हातातील मोबाईलचा पासवर्ड पाहिला. मोबाईलला हिसका देऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली. फिर्यादी यांनी नकार दिल्यानंतर आरोपी रिक्षातून पळून गेले.

त्यानंतर त्या दोघांनी फोन पेवरून 9 हजार रुपये ट्रान्सफर करून, नंतर बजाज फायनान्स कंपनीकडून 3 लाख 89 हजारांचे पर्सनल लोन घेऊन त्यापैकी 1 लाख 85 हजार फोन पेद्वारे काढून घेतल्याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नाशिक येथील कळसकर मळा येथे राहणार्‍या एका 48 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 13 ऑक्टोबर रोजी रात्री आठ-साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

तिसर्‍या घटनेत विनय धमेंद्र यादव (वय 22, रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी) हे 26 डिसेंबर रोजी पठाणशाह बाबा दर्गा येथून रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी चालले असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांचा मोबाईल जबरी चोरी करून नेला. याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घरफोडीच्या पहिल्या घटनेत येरवड्यात पुष्पा राजनाथ यांच्या घराचा दरवाजा बंद असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून 90 हजारांचे सोन्याचे दागिने तसेच परिसरात राहणार्‍या मुकेश बबन पांचाळ, लियाकत शमशुद्दीन शेख, सविता श्रीमंत सुरते यांच्या घरी घरफोडी करून 13 हजार 500 रुपयांची रोकड चोरून नेली. 25 डिसेंबर 2022 ते 27 डिसेंबर 2022 दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments