लग्नाच्या आमिषाने घात, मुलींनो जरा जपून

 


'तू मला आवडतेस' पासून ते 'मला तुझ्याशीच लग्न करायचंय' इथपर्यंतच्या संवादात मुलींना वेगवेगळी आमिषे दाखवली जातात. त्या देखील या आमिषांना बळी पडून सुखी संसाराची स्वप्ने पाहतात

दरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध झालेले असतात. तो अचानक लग्नास नकार देतो आणि तिने डोळेझाकपणे ठेवलेल्या विश्‍वासाला एका क्षणात तडे जातात. नंतर सुरु होतो कायद्याने न्याय मागण्याचा प्रवास. चालू वर्षात लैंगिक अत्याचाराच्या 200 घटना घडल्या आहेत. त्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे सर्वाधिक प्रकार आहेत.

महिलेला वेगवेगळी आमिषे दाखवून तसेच तिच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकार पोलीस दप्तरी दाखल होतात. काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील तांत्रिक बदल उघड होतात. पण यामुळे उर्वरित घटनांकडे डोळेझाक करता येत नाही. चालू वर्षात पिंपरी-चिंचवड शहरात लैंगिक अत्याचाराचे तब्बल 200 गुन्हे पोलीस दप्तरी दाखल आहेत.

अल्पवयीन मुली, तरुणी तसेच विवाहित महिलांनाही लग्नाचे आमिष दाखवले जाते. लग्नाची भुरळ पाडून नवीन स्वप्ने दाखवली जातात. त्यात त्यांना अडकवून त्यांच्या मनाच्या विरोधात जाऊन त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले जातात. काही प्रकरणांमध्ये विवाहइच्छुक असणाऱ्या तरुणी आणि महिलांशी वेगवेगळ्या मेट्रोमोनियल व सोशल मीडियावरील साइट्‌सच्या माध्यमातून संपर्क साधला जातो. काही ठग विशेषत: नोकरदार आणि उच्चभ्रू कुटुंबातील तरुणींना लग्नाचे आमिष दाखवितात.

मोठ-मोठ्या बढाया मारतात आणि अचानकच व्यवसायात मोठी गरज किंवा घरातील कुणी सदस्य आजारी असल्याचे कारण सांगून तात्काळ पैशांची गरज असल्याचे सांगून मोठी आर्थिक फसवणूक करतात. लग्नाच्या आमिषापायी मुली, तरुणी आणि काही प्रकरणांमध्ये महिलांनाही बरेच काही गमावावे लागते. त्यानंतर त्या मग अशी प्रकरणे पोलीस ठाण्यात दाखल केली जातात.

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फूस लाऊन पळवून न्यायचे. त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आणि काही दिवसांनी लग्न न करता परत घरी यायचे. असेही प्रकार शहरात घडले आहेत. करोना साथीमुळे लॉकडाऊनच्या काळात सन 2020 आणि सन 2021 मध्ये नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध होते. त्या कालावधीतही लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.


Post a Comment

0 Comments