महिलेला दुचाकीहून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्राची जबरी चोरी करणार्या आरोपीस रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. रांजणगाव पोलिसांच्या माहितीप्रमाणे, बुरुंजवाडी ते शिक्रापूर रस्त्यावर दि.
23 डिसेंबर रोजी दुपारी शकुंतला वाबळे (वय 60, रा. वाबळेवाडी, शिक्रापूर) यांना एका अनोळखी व्यक्तीने लिफ्ट देण्याचा बहाणा करून मोटारसायकलवर बसवून नेले. काही अंतरावर गेल्यानंतर चाकूचा धाक दाखवुन गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र चोरून नेले. अनोळखी आरोपीविरुध्द रांजणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीचा पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी सीसीटीव्ही कॅमे-यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. आरोपी गोंधळेनगर, हडपसर येथील एका गल्लीमध्ये तो जाताना दिसला. तपास पथकाने त्या परिसरातील सर्व इमारती व घरांची पाहाणी केली असता त्यांना एका इमारतीच्या पार्किंगमध्ये मोटारसायकल दिसून आली. इमारतीमध्ये सर्व खोल्यांची पाहाणी केली असता त्यांना आरोपी सापडला. पोलिसांनी त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
आरोपीचे नाव सचिन व्हळगळ (वय 23, सध्या रा. गोंधळेनगर, हडपसर, मूळ रा. हटकरवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) असे आहे. आरोपीकडून मणिमंगळसूत्र जप्त केले आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील मलठण येथून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीस न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करत आहेत.
0 Comments