वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या सावकाराचा खून


 

व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या सावकाराचा गळा आवळून खून करून मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना सातारा तालुक्यात उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने हे क्लिष्ट खून प्रकरण उघडकीस आणले असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.विलास महिपती जाधव (रा. खोडद, ता. जि. सातारा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, आकाश तुकाराम जांभळे (रा. जांभगाव, ता. जि. सातारा), संतोष संभाजी मोरे (रा. रामकृष्णनगर, काशीळ, ता. जि. सातारा), संजय रामचंद्र जाधव (रा. खोडद, ता. जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विलास जाधव हे 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. परंतु त्यानंतर ते घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने बोरगाव पोलिसांत दि. 22 रोजी ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तथापि, विलास जाधव यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता, विलास जाधव यांनी व्याजाने पैसे दिलेल्या खोडद येथील तिघांनी त्यांचा खून केल्याची माहिती हाती आली. दरम्यान, विलास जाधव हे 20 नोव्हेंबर रोजी एका चारचाकी वाहनातून दोन इसमांच्या बरोबर जाताना निसराळे फाटा येथे विलास जाधव यांच्या एका नातेवाईकाने पाहिले होते. 

त्याने ती माहिती जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना दिली. त्यानुसार आपल्या बेपत्ता पतीला खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी पळून नेल्याची तक्रार जयश्री जाधव यांनी बोरगाव पोलिसांत दिल्याने कलम 364, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, काल संबंधित दोन्ही इसम निसराळे फाटा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर विशेष पथकाने वेगवान

हालचाली करत त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता,

 व्याजाने घेतलेल्या पैशासाठी जाधव यांनी तगादा लावल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून आणखी एका साथीदाराच्या मदतीने कट करून यवतेश्वर ते कास रस्त्यावर नेऊन गळा आवळून त्यांचा खून केल्याची व मृतदेह दरीत फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली. तीनही आरोपींना अटक करून बोरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील, अंमलदार उत्तम दबडे, अतीश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, संतोष सपकाळ, संतोष पवार, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.


Post a Comment

0 Comments