मुले चोरल्याच्या अफवेतून 2 तरुणीसह तिघांना मारहाण

 


मुले चोरण्यासाठी आल्याचे समजून तळोजा गावात राहणाऱ्या पाच ते सहा व्यक्तींनी एका रिक्षाचालकाला व दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याची घटना तळोजा येथे तीन दिवसांपूर्वी घडली.

मारहाणीत रिक्षाचालकाच्या रिक्षाची देखील तोडफोड केली आहे. या मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी सहा अज्ञात व्यक्तींविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव महम्मद गुलमोहम्मद शकील अन्सारी (२४) असे असून तो शिळफाटा येथील झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासह राहतो. महम्मद अन्सारी हा भाड्याने रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. मोहम्मद अन्सारी हा प्रवासी घेऊन कळंबोली येथे गेला होता. त्यानंतर तो पुन्हा शिळफाटा येथे प्रवासी घेऊन जाण्यास निघाला होता. तळोजा गाव येथे दोन महिला प्रवाशांना सोडल्यानंतर महम्मद अन्सारी याला शिळफाटा येथे राहणाऱ्या त्याच्या ओळखीतील दोन तरुणी निदर्शनास आल्या. त्यामुळे महम्मद अन्सारी हा त्या तरुणींकडे विचारपूस करत असतानाच त्यांच्या पाठीमागून आलेल्या चार ते पाच व्यक्तींनी सदर तरुणी या मुले चोरण्यासाठी आल्याचे सांगत त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रिक्षाचालक महम्मद अन्सारी याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी तो देखील मुले चोरण्यासाठी आल्याचे सांगत त्यालाही मारहाण केली.


Post a Comment

0 Comments