घरफोडीत 27 तोळे सोने लंपास

 


शहरातील गुरुवार पेठेतील जेधे वाड्यामध्ये अज्ञात चोरट्याने शिवाजीराव दत्तात्रय जेधे यांच्या घराचे कुलूप तोडून तब्बल 27 तोळे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हातोहात लांबवल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेने पोलिसांपुढे जलद तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा शहर, शाहूपुरी, बोरगाव, सातारा तालुका या पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची चार पथके तैनात करून तपासासाठी रवाना केली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून यासंदर्भात काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कमानी हौदालगत असणाऱ्या जेधे वाड्यामध्ये शिवाजीराव दत्तात्रय जेधे (रा. 508, गुरुवार पेठ) काही कामानिमित्त त्यांच्या पत्नीसह पुण्याला तर त्यांची कन्या मुंबईला गेली होती. घर कुलुपबंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लांबवला. यामध्ये जेधे यांची कन्या आणि पत्नी यांच्या दागिन्यांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments