महिला पोलिसाला भर रस्त्यात चपलेने मारहाण , 35 वर्षीय महिला अटकेत

 


35 वर्षीय महिलेविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात मारहाण, सरकारी कामात अडथळानिर्माण करणे व इतर कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे. याबाबत महिला पोलीस शिपाई यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार,सदर महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या विश्रामबाग वाहतूक विभागात कर्तव्यास असून, त्या प्रतिनियुक्तीवर येथे आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी त्यांना टिळक चौकात कर्तव्य देण्यात आले होते. त्या टिळक चौकात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाहतूक नियमन करत होत्या. दरम्यान, यातील आरोपी महिला ताडीवाला रस्ता परिसरात राहत आहे.

संबंधित महिला मध्यवस्तीत आली होती. त्यादरम्यान, या महिलेची दुचाकी वाहतूक पोलिसांनी उचलून आणली होती. त्यामुळे संबंधित महिला दुचाकीसाठी याठिकाणी आली होती. तक्रारदार या उभ्या असताना महिला त्यांच्याजवळ आली व माझी गाडी येथे का आणली अशी विचारणा केली. तक्रारदारांनी त्यांची गाडी उचलली नसल्याने तसेच त्या विश्रामबाग विभागात असल्याने त्यांनी महिलेला मला माहित नाही. मी दुसऱ्या विभागात कर्तव्यास आहे. तुम्ही शेजारी असलेल्या फरासखाना वाहतूक विभागात चौकशी करा.

त्याचा राग या महिलेला आला. तिने थेट अरेतुरेवर येत 'तु पोलीस खात्यात असून, तुला माहिती नाही का', असे म्हणत वाद घातला. ही महिला इतकी चिडली की तिने अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांना पायातील चप्पल काढून थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. भरदुपारी गजबजलेल्या चौकात तिने महिला कर्मचाऱ्यांना चप्पलने बेदम मारहाण केली. तर, त्यांचा ड्रेस फाडून त्यांच्या चेहऱ्यावर नख देखील ओरखाडले. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत मागविली. तरीही ही महिला शांत झाली नाही. तिने अश्लील शिवीगाळ सुरूच ठेवली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तिच्यावर गुन्हा दाखलकरून तिला अटक केली. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments