म्हसरूळ येथे आश्रमातील आदिवासी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आली असतानाच, शहरात दोघींचा विनयभंग तर, एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या अल्पवयीन मुलीस संशयित विशाल धनगर (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. नगर) याने लग्नाचे आमिष दाखवून त्र्यंबकेश्वरला नेले. त्या ठिकाणी बलात्कार केला. तसेच सदर प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली. सदर प्रकार गेल्या १४ जूनला घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, मनोरुग्ण युवतीच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक केली आहे. मधुकर महादू सूर्यवंशी (७०, रा. विडी कामगार नगर, अमृतधाम), असे संशयिताचे नाव आहे.
युवतीच्या आईच्या फिर्यादीनुसार, ३० वर्षीय मनोरुग्ण युवतीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत संशयिताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी आडगाव पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत, मेरी लिंक रोडवरील साई शिवनगरमध्ये भांडणाची कुरापत काढून एकाने शेजारी राहणाऱ्या महिलेस शिवीगाळ करीत विनयभंग केला. मंदार ठाकरे (रा. शिवसाईनगर) असे संशयिताचे नाव आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. २८) सायंकाळी संशयित ठाकरे याने जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. तसेच, झाडांच्या कुंड्या मारून त्यांचा दरवाजाचे नुकसान केले. त्यांना मारहाण करीत अंगावरील गाऊन फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments