महिलेच्या छेडछाडीवरून तुंबळ हाणामारी

 


चाकण : औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी ( ता.खेड ) येथे महिलेच्या छेडछाडीमधून झालेल्या वादातून एकाने धारदार शस्त्राने दोन जणांची हत्या केली.

धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फरारी खुनी हल्लेखोराच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सूरज नंदकुमार चव्हाण (वय.२७ वर्षे,सध्या रा. सावरदरी) आणि अनिकेत किसन पवार (वय.२४ वर्षे,सध्या रा. तरस यांची भाड्याची खोली,सावरदरी) या दोघांवर चाकू सारख्या धारदार हत्याराने हल्ला करून खून केल्याप्रकरणी प्रदीप दिलीप भगत ( सध्या रा.शिवमपार्क,सावरदरी ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना भक्ती अपार्टमेंट समोर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी गावामध्ये वरील सर्व जण भाडेकरू म्हणून राहत आहेत. सूरज चव्हाण हा आपल्या कुटुंबासह राहत आहे. यापूर्वी प्रदीप हा फिर्यादीच्या शेजारील महिलेची वारंवार छेड काढत होता. प्रदीप याने आज (दि.८) रोजी सदर महिलेच्या बाथरूमची खिडकी फोडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सूरज चव्हाण त्याचा मित्र अनिकेत आणि प्रदीप यांच्यात तुंबळ हाणामारी होऊन प्रदीप याने दोघांवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. सूरज आणि अनिकेत यांना वर्मी घाव लागल्याने एक जण जागेवरच कोसळला. तर एक गंभीर जखमीस स्थानिक नागरिकांनी अधिक उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी येथील भाडेकरू म्हणून राहत असलेल्या लोकांमध्ये वाद निर्माण होऊन त्यातून डबल मर्डर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महाळुंगे पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खुन करून फरारी झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments