झोपलेल्या व्यक्तीच्या कानाजवळ सुतळी बॉम्ब फोडला, कान तुटून पडला

 


दिवाळीत  फटाके फोडताना दुखापत होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन सातत्याने केलं जातं.

परंतु योग्य खबरदारी घेतली नाही तर काय होतं, याची प्रचिती वर्धा जिल्ह्यात आली. झोपलेल्या व्यक्तीच्या कानाजवळ सुतळी बॉम्ब फोडल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन चक्क कान तुटून पडल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्ध्यात स्टेशन फैल परिसरात काल (30 ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली. रात्री घरी झोपलेल्या व्यक्तीच्या कानाजवळ सुतळी बॉम्ब फोडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि कान तुटून पडला. युसूफ खान पठाण (वय 56 वर्षे) असं जखमी व्यक्तीचं नाव असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे फटाक्यांची तीव्रता अशाप्रकारे शरीराचा अंगही एका क्षणात वेगळा करु शकतो हे या घटनेने सिद्ध झालं आहे. मात्र ज्या अज्ञाताने मध्यरात्री दीडच्या सुमारास गाढ झोपलेल्या व्यक्तीच्या जीवाची पर्वा न करता अंथरुणात सुतळी बॉम्ब फोडला आहे, अशांवर कडक कारवाईची मागणी जखमी युसूफ खान पठाण यांचा मुलगा ऐफाज युसूफ खान याने केली आहे.


Post a Comment

0 Comments