अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून एकाची धारधार शस्त्राने हत्या

 


जळगाव: सध्या वाळू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. याच वाळू तस्करीवरून झालेल्या वादातून एकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे.

घटना रविवारी सकाळी भातखंडे -उत्राण ता. एरंडोलनजीक घडली आहे. सचिन उर्फ सोन्या देवीदास पाटील (३९, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मृत सचिन पाटील हा रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास दुचाकीने भातखंडे गावाहून उत्राणकडे जात होता. यादरम्यान मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देत फरफटत नेले. यानंतर काही जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात सचिन पाटील हा गंभीर जखमी झाला. यानंतर सचिनच्या चुलत भावाने त्याला गंभीर जखमी अवस्थेत पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. 

या हत्येप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन हा वाळूमाफिया असल्याने पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वीच सचिनचा गिरड ता. भडगाव येथील युवकांशी वाद झाला होता.
या प्रकरणी सचिनला अटकसुद्धा करण्यात आली होती. सचिनच्या माघारी आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.


Post a Comment

0 Comments