मासेमारी करताना दोघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू

 


नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये देवळे परिसरातील नदीपात्रात मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तब्बल तीन दिवसांनी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. पंकज काशिनाथ पिंगळे, कृष्णा काशिनाथ पिंगळे (रा. आवळखेड) हे दोघे सख्खे भाऊ देवळे गावाजवळ दारणा नदीपात्रात तीन दिवसांपूर्वी मासेमारी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान एक भाऊ पाण्यात बुडत असल्याचे पाहून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावला. यानंतर भावाला वाचवत काठावर आणत असताना अचानक दोघेही बुडाले. हे दोघेजण बुडत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी तातडीने पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाला पाचारण केले.

यानंतर बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली मात्र या दोघांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. सलग तीन दिवस हे शोधकार्य सुरु होते. अखेर आज सकाळी दोघा भावांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. यानंतर हे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेत एकाच कुटुंबातील दोघ सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने इगतपुरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

या दोघां भावांच्या मृत्यूने पिंगळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
पंकज आणि कृष्णाच्या पश्चात आई, एक लहान भाऊ, पंकजची पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे.
पिंगळे कुटुंब हे इगतपुरी तालुक्यातील फणसवाडी येथील आदिवासी पाड्यावर राहतात.
पिंगळे कुटुंबातील दोन्ही कमावती मुले दगावल्याने आता त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.


Post a Comment

0 Comments