खो खो स्पर्धा आटोपून ती माघारी परतली; रानडुक्कर धडकले अन् जागीच गतप्राण झाली

 


पोंभूर्णा : चंद्रपूर येथील शासकीय कार्यक्रम आटोपून देवाडा खुर्दला येत असताना सातारा तुकूम घटमाउली जंगल परिसरातील मुख्य मार्गावर दुचाकीवरून उतरून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अंगणवाडी सेविकेला रानडुकराने जोरदार धडक दिली.

यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

शीला रवींद्र बुरांडे (४०),रा.देवाडा खुर्द असे मृतक महिलेचे नाव आहे. शीला रवींद्र बुरांडे या पोंभूर्णा पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या देवाडा खुर्द येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. चंद्रपूर येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत त्या अंगणवाडी सेविकेच्या संघाकडून खो-खो स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेल्या होत्या.

खो-खोची स्पर्धा आटोपल्यानंतर त्या देवाडा खुर्दला आपल्या पतीसोबत दुचाकीने परत येत असताना गिलबिली-सातारा तुकुम मार्गावरील जंगल परिसरातील घटमाउली मंदिराजवळ त्या रस्त्याच्या कडेला उतरल्या. यावेळी बाजूलाच झुडपात असलेल्या रानडुकराने शीला यांना मागून जोरदार धडक दिली. यात त्या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. माहिती मिळताच उमरी पोलिसांनी पंचनामा केला आहे.


Post a Comment

0 Comments