यंदा निसर्गाने शेतकऱ्याला उत्तम साथ दिल्याने हरभऱ्याचे पीक चांगले आले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी खुश आहे. सध्या सगळीकडे हरभरा काढण्याचे काम चालू आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गेवराई येथील गट नंबर 291शिवारामध्ये देखील मळणी यंत्राच्या साह्याने हरभरा काढण्याचे काम सुरु होते. यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
काय घडले नेमके?
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गेवराई शिवारात वंदना दामोधर गिऱ्हे यांची शेती आहे. त्यांनी हरभऱ्याची सोंगणी करून ठेवली होती. काल शुक्रवारी हरभऱ्याची मळणी करायची होती म्हणून वंदना गिऱ्हे या आपल्या कुटुंबासोबत शेतात गेल्या होत्या. हरभऱ्याची मळणी करण्यासाठी मळणी यंत्र चालू केले आणि वाळलेला हरभरा मळणी यंत्रात टाकण्यासाठी वंदना या वाकून मळणी यंत्रात पाहू लागल्या आणि याचदरम्यान मोठा घात झाला. मळणी यंत्रात वाकून पाहात असताना वंदना यांची वेणी मळणी यंत्राच्या बेल्टमध्ये अडकली आणि त्या मळणी यंत्रात ओढल्या गेल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.
यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमर मोरे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वजण हादरून गेले आहेत. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. वंदना यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. वंदना यांच्यावर काल रात्री साडेसात वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुचाकीवरून पडून महिला शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू
काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक दुर्दैवी घटना रत्नागिरीमध्ये घडली होती.
यामध्ये दुचाकीवरून पडून एका महिला शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला होता.
सुषमा जयवंत निकम असे या अपघातात मृत पावलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या 54 वर्षांच्या होत्या.
सुषमा निकम या खेड तालुक्यातील मोहाने या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून
कार्यरत होत्या. घटनेच्या दिवशी त्या सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जात होत्या.
त्यावेळी त्यांनी एका दुचाकीला हात दाखवला. यानंतर त्या दुचाकीस्वराच्या पाठीमागे बसून त्या खेडच्या दिशेने
येत होत्या. यादरम्यान कुडोशी गावाजवळ असलेल्या स्पीड ब्रेकर वरून गाडी गेल्यानंतर त्यांचा तोल गेला आणि
त्या रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
0 Comments