आय एम सॉरी मम्मी..... असा मेसेज पाठवीत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

 


तुमसर (भंडारा) : आय एम सॉरी मम्मी... असा मेसेज आईला पाठवित बारावीच्या विद्यार्थिनीने आजीच्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तुमसर तालुक्यातील हसारा येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली.

वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आजीकडे शिक्षणासाठी राहत होती.

तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील (१८) रा. हसारा टोली. ता तुमसर असे मृत विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. ती तुमसर येथील मातोश्री विद्या मंदिरात बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. मूळ नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील तनिष्काच्या वडीलांचे निधन झाले होते. त्यामुळे ती हसारा येथे आपल्या आजीकडे शिक्षणासाठी राहत होती. बाराव्या वर्गाचे प्रात्यक्षिक पेपर सुरु आहेत.

रविवारी रात्री आपल्या मोबाईलवरून कामठी येथे राहत असलेल्या आईला आय एम साॅरी .. लव यू मम्मी..असा मेसेज फाॅरवर्ड करुन मध्यरात्रीच्या सुमारास पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी ७ वाजता मावशी व आजीने तनिष्का आतापर्यंत उठली का नाही. म्हणून तिच्या खोलीत खिडकीतून डोकावून बघितले. तेव्हा तनिष्का गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. मावशी व आजीने एकच हंबरडा फोडला.

घटनेची माहीती गावात होताच नागरीकांनी एकच गर्दी केली. तनिष्काच्या आत्महत्याचे कारण कळू शकले नाही. तिच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची नोंद तुमसर पोलिसांत करण्यात आली असून तपास ठाणेदार नितिन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंभरे करीत आहे.


Post a Comment

0 Comments