आई - वडिलांना पट्ट्याने बेदम मारहाण , दारूच्या नशेत मुलाचे कृत्य

 


सातारा : दारूच्या नशेत मुलाने आई-वडिलांना पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सैदापूर (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी मुलावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रकाश बापू कदम (वय ३८, रा. सैदापूर, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बापू गणपत कदम (वय ६२, रा. सैदापूर, ता. सातारा) हे सलून व्यावसायिक आहेत. बुधवार, दि. २५ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा प्रकाश याने घराला बाहेरहून कडी घातली. ही कडी का घातली, असे वडील बापू कदम यांनी मुलाला विचारले. त्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या प्रकाशने वडिलांना कमरेचा पट्टा काढून बेदम मारहाण केली. तसेच अंगणात पडलेले लाकडी दांडकेही त्यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर, पाठीवर, हातावर मारले. हा वाद सोडविण्यासाठी पत्नी कुसूम या आल्या असता त्यांनाही पट्ट्याने व्रण उठेपर्यंत मुलाने बेदम मारहाण केली. मुलाच्या मारहाणीत वडिलांचा खांदा फ्रॅक्चर झाला तर आईच्या पाठीवर व्रण उठले. गेल्या तीन दिवसांपासून हे दाम्पत्य जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


Post a Comment

0 Comments