बालिकेवर अत्याचार , वृध्दास कारावास

 सांगली : बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ज्ञानदेव महादेव चव्हाण (वय ६८) या आरोपीस कलम ३७६ (अ, ब) आणि 'पोक्सो' कायदा कलम ८ प्रमाणे दोषी धरून २० वर्षे सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिन्यांची सश्रम कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.

अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. एस. महात्मे यांनी आज ही शिक्षा सुनावली. तसेच पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचे आदेश त्यांनी दिले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले.

या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, ही घटना २०१९ च्या डिसेंबर महिन्यात घडली होती. आठवर्षीय पीडित बालिका आरोपीच्या घरासमोर खेळत असताना आरोपी चव्हाण याने तिला घरामध्ये बोलावून तिचा विनयभंग केला. त्यानंतर पुन्हा त्याने या बालिकेस घरी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेबाबत पीडित बालिकेच्या आईस समजल्यानंतर त्यांनी पलूस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावरून आरोपी ज्ञानदेव चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी पलूस पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी तपास केला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, पीडितेचा, तिच्या आईचा, डॉक्टरांचा जबाब नोंदविला यावरून जिल्हा न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यातील पीडितेचा, तिच्या आईचा व डॉक्टरांचा जबाब, तपासी अधिकारी यांचा पुरावा व न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळेचा अहवाल या सर्वांचा विचार करून आरोपी चव्हाण याला कलम ३७६ (अ ब) आणि 'पोक्सो' कायदा कलम ८ नुसार दोषी धरण्यात आले.

या खटल्यात पलूस ठाण्याचे पोलीस हवालदार पठाण, पैरवी कक्षातील महिला पोलीस सुनीता आवळे आणि वंदना मिसाळ व जिल्हा न्यायालयाच्या पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळाले.


Post a Comment

0 Comments