तीन लाख रूपये दया , अन्यथा कुटुंबीयांसह जीवाला मुकाल

 


शहरातील एका प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंटसह (सीए) त्याच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत 30 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने एकाला अटक केली. गरवारे पूल परिसरात पैसे नेण्यासाठी आला असता त्याला सापळा रचून पकडण्यात आले. किरण रामदास बिरादार (वय 24, रा. मांजरी. मूळ रा. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मुकुंदनगर येथील एका चार्टर्ड अकाउंटंटने तक्रार केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिरादारने फेसबुकवरून सीएंचा संपर्क क्रमांक घेतला. त्यानंतर एका अनोळखी नंबरवरून फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलांना व त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या सीएंनी त्याला पैसे देण्याचे कबूल केले. त्यानंतर बिरादार त्यांना सतत धमक्या देत होता. शेवटी सीएंनी गुन्हे शाखेकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

आलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. या दरम्यान आरोपीने गुरुवारी सकाळी सीएंना फोन करून पैसे घेऊन गरवारे पूल परिसरात बोलावले. त्यानुसार यूनिट दोनच्या पथकाने गरवारे पूल परिसरात सापळा रचून बिरादार याला ताब्यात घेतले. मात्र, त्याने पैसे घेण्यासाठी तीन ते चार ठिकाणे बदलली. पोलिस असल्याचा संशय येताच तो मोबाईल फेकून पळून जावू लागला. मात्र, पथकाने पाठलाग करून बिरादार याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

दरम्यान, बिरादार याने अशाचप्रकारे सोशल मीडियावरून नागरिकांचे संपर्क क्रमांक घेऊन धमकी देत पैशाची मागणी करत असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 चे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments