25 हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक जाळ्यात

 


विटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची लाच स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक जाळ्यात अडकला आहे.

लाच घेताना ग्रामसेवकास जळगाव एसीबीच्या पथकाने आज सोमवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. राजेंद्र लक्ष्मण पाटील (55, रा.सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचा सुमारे मागील ३० वर्षापासुन निम ग्रामपंचायतीच्या हद्दीत विटभट्टीचा व्यवसाय असून तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे तहसिल कार्यालय अमळनेर यांचे नावे 6,000/-रुपये रॉयल्टी भरलेली आहे. तरी सुद्धा तक्रारदार यांना सदर लोकसेवक यांनी निम गावच्या ग्रामपंचायत हद्दीत जर विटभट्टी व्यवसाय करायचा असेल तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल असे सांगुन निम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात निम ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष २७,५००/रुपयांची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. तडजोडी सदर लाच मागणी केलेल्या रक्कमेपैकी २५,००० रुपये रोख रक्कम ग्रामसेवकाला निम ग्रामपंचायत कार्यालयात स्वतःस्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचखोर ग्रामसेवकावर मारवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, नाईक ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे तसेच एएसआय एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींनी यशस्वी केला.


Post a Comment

0 Comments