घरात शिरून टोळक्याने फोन पे वरून पैसे घेऊन कार नेली पळवून

 


पुणे :  शेजारी राहणार्‍या गुंडाने त्याच्या साथीदारांना घेऊन घरात प्रवेश केला. फोन पे  वरुन जबरदस्तीने स्वत:च्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुन घेऊन घरात नासधुस केली.

त्यानंतर जाताना बळजबरीने कार चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. 

याप्रकरणी सचिन संजय गायकवाड (वय २४, रा. साईनाथनगर, वडगावशेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. ५४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहन रवींद्र गायकवाड (वय २४, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी), निहाल ऊर्फ मनोज नागनाथ गायकवाड (वय २७) यांनी अटक केली असून प्रशांत पवार (वय २५), अक्षय चव्हाण यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा  दाखल केला आहे. हा प्रकार साईनाथनगर येथे रविवारी पहाटे ४ वाजता घडला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि रोहन गायकवाड हे शेजारी राहण्यास आहेत. फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह घरात झोपले असताना रोहन त्यांच्या साथीदारांना घेऊन आला. फिर्यादी यांनी दरवाजा उघडला असताना त्यांना धक्का देऊन ते घरात शिरले. तुझ्या घरात येवढी मुले कशसाठी आले, तुम्ही काहीतरी चोरीमारी करण्याचा प्रयत्न करीत असणार, असे म्हणून रोहन याने फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. त्यांच्या हातातील मोबाईल घेऊन त्यातून फोन पेद्वारे २० हजार रुपये जबरदस्तीने त्याचे खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले. त्याचे मित्र अमोल जाधव व आकाश् गायकवाड यांना मारहाण केली. त्यांच्या घरातील एलईडी टिव्ही फोडून नुकसान केले. फिर्यादीचा भाऊ आकाश गायकवाड यांच्या खिशातून इरटीगा गाडीची चावी घेऊन गाडी घेऊन पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक कुमरे तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments