५३ दिवसापूर्वी लग्न करून सासरी आली मुलगी ; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

 


छपरा - मागील ८ डिसेंबरला विवाह करून सासरी आलेल्या नवविवाहितेने तिच्या खोलीत पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमोर्टमसाठी पाठवला.

छपराच्या मुफस्सिल परिसरातील ही घटना आहे. कुलदीप नगरमध्ये राहणाऱ्या हेमंत कुमार उर्फ राजचं लग्न ८ डिसेंबर २०२२ रोजी नेहा कुमारीसोबत झाले होते. नेहाच्या अचानक मृत्यूनं सगळ्यांना धक्का बसला.

गेल्या सोमवारी सकाळी सासरच्या लोकांनी नेहाच्या घरच्यांना कॉल केला आणि तुमच्या मुलीची तब्येत ठीक नाही असं सांगितले. मात्र त्यानंतर नेहाने गळफास घेत आत्महत्या केल्याचं म्हटलं. नेहा संजय सिंह यांची मुलगी होती. मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच सिंह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. लग्नाला काहीच दिवस झाले असताना मुलीने हे टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न नेहाच्या कुटुंबियांना पडला होता. मृत महिलेच्या वडिलांनी सांगितले की, लग्नानंतर सासरचे लोक मुलीला मोबाईलवर कमी बोलायला देत होते.

या प्रकरणी पोलीस अधिकारी मुनेश्वर प्रसाद सिंह म्हणाले की, एका नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. मृत महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय की, माझ्या मुलीचा नवरा आणि तिचा सासरा नवीन व्यवसाय सुरू करणार होते. त्यासाठी त्यांना ५ लाख रुपये हवे होते. त्याच कारणाने सासरच्यांनी त्यांच्या मुलीला मारून त्याला आत्महत्येचं रुप दिले असा आरोप त्यांनी केला.

मी माझी मुलगी नेहा कुमारीचं लग्न ८ डिसेंबरला हेमंतकुमारसोबत केले होते. विवाहानंतर ९ डिसेंबरला प्रथेनुसार मुलीची पाठवणी करण्यात आली. मी जेव्हा कधीही मुलीला भेटण्यासाठी तिच्या सासरी यायचो तेव्हा मला भेटून दिले जात नव्हते. ती पतीसह कधी मामाच्या घरी, कधी आत्याच्या घरी गेलीय असं सांगायचे. मी माझ्या मुलीशी फोनवरून बोलायचो तेव्हा तिच्या बोलण्यावरून तिच्यावर कुणाचा तरी दबाव असून ती मनातलं काही सांगू शकत नाही असं वाटायचं. नेहानं तिच्या सासरचे ५ लाख रुपये मागतायेत असं सांगितले होते.

३० जानेवारी सकाळी ७.३० वाजता मला मुलीच्या सासरच्यांकडून फोन आला नेहाची तब्येत खूप खराब आहे असं सांगितले. मी आणखी विचारलं तेव्हा तिने गळफास घेतल्याचं मला कळवले. जी मृत अवस्थेत होती. मी सकाळी ९.३० वाजता घरी पोहचलो तेव्हा तिच्या खोलीचा दरवाजा उघडा होता आणि तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. मला तिच्या सासरच्यांवर संशय आहे त्यांनी मुलीची हत्या करून त्याला आत्महत्येचं रुप दिले आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई करावी असं मृत महिलेच्या वडिलांनी तक्रारीत सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments