भरदुपारी बिबट्याचा शेळीवर हल्ला

 


टाकळी हाजी येथील शिंदेवस्तीवरील शिवाजी शिंदे यांच्या शेळीवर गुरुवारी (दि. 19) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला.

यामध्ये शेळीचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी शिवाजी शिंदे यांचा मुलगा सोपान हा घराजवळच शेतात शेळ्या चारत असताना अचानक उसातून आलेल्या बिबट्याने सोपान शिंदे याच्यासमोरच शेळीवर हल्ला करून उसाच्या शेतात गेला. बिबट्याला पाहून भयभीत झाल्याने त्याने आरडाओरडा केला असता, लोकांनी तिकडे धाव घेतली. बिबट्या आकाराने खूप मोठा होता, त्याला प्रतिकार केला असता तर एकट्या मनुष्यावर त्याने हल्ला केला असता, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

जमलेल्या लोकांनी उसाच्या शेतात शेळीचा शोध घेतला असता, मृतावस्थेतील शेळी आढळून आली. तिच्या मानेचा भाग बिबट्याने खाऊन टाकला होता. सातत्याने पशुधनावर होत असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली असून, दिवसाही शेतात एकट्याने जाण्यास भीती वाटत आहे.

वन विभागाचे अधिकारी घटना घडल्यानंतर पंचनामा करून बिबट्यांसोबत जगावे लागेल, अशा प्रकारे प्रबोधन करत आहेत; परंतु या वाढत्या हल्ल्यामुळे पशुधनाबरोबरच मनुष्याची जीवितहानी रोखण्यासाठी उपाययोजना करताना मात्र दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे.


Post a Comment

0 Comments