दारूच्या नशेत पतीने केला पत्नीचा खून

 


दारूच्या नशेत पतीने पत्नीला मारहाण करुन तिचा खून केल्याची घटना रविवारी (दि.१) यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरातील पंचशीलनगरमध्ये घडली.

वैशाली उत्तम गाडेकर (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती उत्तम गाडेकर (वय ४०) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी सकाळी वैशाली व उत्तम दोघांनी मद्य प्राशन केले होते. यानंतर या दोघांमधील वादाला सुरूवात झाली. पती उत्तमने वैशालीला काठीने बेदम मारहाण केली. या दोघांमध्ये दारू पिऊन नेहमीच वादावादी होत होती. त्यामुळे शेजाऱ्यांनीही सुरुवातीला याकडे लक्ष दिले नाही. मात्र, घरातील तीन वर्षांची मुलगी व दोन वर्षांचा मुलगा सारखे रडत असल्याने सायंकाळी घरात डोकावून बघितले. त्यावरून हा प्रकार उघडकीस आला.

लोहारा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. जखमी वैशालीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी वैशालीचे वडील ज्ञानेश्वर बारकू कोमटी (रा.उत्तरवाढोणा) यांनी मुलीचा खून झाल्याची तक्रार दिली आहे. त्यावरून लोहारा पोलिसांनी आरोपी उत्तम गाडेकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी पतीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे गाडेकर दाम्पत्याची दोन्ही मुले बेवारस झाली आहेत.

Post a Comment

0 Comments