भांडणात मदत केल्यामुळे एकावर केला खुनी हल्ला

 


मेंढ्याच्या वाटपावरून झालेल्या वादात मित्राने मदत केल्याच्या रागातून, त्याला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात घडली. याबाबत दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मारूती दगडू फलके (रा. गोकुळवाडी, खारेकर्जुने, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मारूती फलके यांचा भाऊ देविदास दगडू फलके हे या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खारेकर्जुने येथे भागचंद भानुदास भापकर व त्यांचा भाऊ कृणाल भापकर यांच्यात मेंढ्या वाटपावरून वाद झाला. या वादात कृणाल याला देविदास फलके याने मदत केल्याच्या रागातून आरोपी भागचंद भापकर याने शंकर होनाजी सोनवणे यास सोबत घेऊन देविदास फलके हा डबा घेऊन जात असताना त्याला गावातील मराठी शाळेजवळ अडविले. त्याला लाथाबुक्क्यांनी, तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत देविदास हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असल्याने त्यांचे बंधू मारूती फलके यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी भागचंद भापकर व शंकर निमसे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी शंकर निमसे यास पोलिसांनी अटक केली असून, भागचंद भापकर हा फरार झाला आहे.


Post a Comment

0 Comments