अविवाहित असल्याचे सांगून युवतीशी विवाह, जीम ट्रेनरवर बलात्काराचा गुन्हा

 


जीममध्ये कसरतीसाठी आलेल्या तरुणीला जीम ट्रेनर युवकाने अविवाहित असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी प्रेमविवाह केला. महिन्याभरातच घरी त्याची पत्नी आणि मुलगा आल्याने युवकाचे बिंग फुटले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने जाब विचारताच युवकाने तिच्याशी शारीरिक संबंधाचे मोबाईलने काढलेले फोटो आणि व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली.

हुडकेश्वरमध्ये राहणारी २८ वर्षीय तरुणी जीममध्ये जात होती. तेथे जिम ट्रेनर रविकांत अशोक धार्मिक (३४, नंदनवन) याच्याशी तिची ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २ नोव्हेंबरला त्याने तिला मागणी घातली. नोव्हेंबर २०२२ मध्ये दोघांनी एका मंदिरात हार घालून प्रेमविवाह केला. दोघांचाही संसार सुरू झाला.

तीसुद्धा जीममध्ये जाऊन सहायक प्रशिक्षक म्हणून काम करीत रविकांतची मदत करीत होती. रविकांत नेहमी मोबाईलने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवत होता. लग्नाच्या महिनाभरानंतर एक महिला आणि ५ वर्षांचा मुलगा थेट घरी आला. रविकांतने विवाहित असल्याचे लपवून लग्न केल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने रविकांतला जाब विचारला. त्याने थेट अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे, तिने लगेच हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला.


Post a Comment

0 Comments