ताडोबात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यु

 


दोन दिवसांपूर्वी ताडोबा व्याघ्र अभयारण्यात दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी (3 डिसेंबर) पुन्हा चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

बछड्यांमध्ये दोन नर व दोन मादींचा समावेश आहे. नर वाघाच्या हल्ल्यात या बछड्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शिवणी बफर झोनमध्ये 1 डिसेंबरला तीन ते चार महिने वयाचे वाघाचे चार बछडे आढळून आले होते. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 30 नोव्हेंबरला जवळच एका वाघिणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तेव्हापासून वनकर्मचारी शिवणी वन परिक्षेत्रातील त्या चारही बछड्यांच्या सुरक्षेसाठी लक्ष ठेवून होते. शुक्रवारी त्याच परिसरात एका नर वाघाचा वावरही निदर्शनास आला होता.

आज शनिवारी चारही बछड्यांचा शोध घेतला असता पथकाला चारही बछडे मृतावस्थेत आढळून आले. त्यामध्ये दोन नर आणि दोन मादी बछडे आहेत. चारही मृतदेहांवर विविध जखमा आढळून आल्या आहेत. शनिवारी या परिसरात दिसलेल्या नर वाघाने त्या चारही बछड्यांना मारल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

या बछड्यांचे चंद्रपुरात शवविच्छेदन करण्यात येणार असून बछडे व मृत वाघिणीच्या ऊतींचे नमुने डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्या नंतर आई व बछड्यांची ओळख पटविण्यास मदत होणार आहे.


Post a Comment

0 Comments