आधी पत्नीसोबत भांडला , नंतर 2 वर्षाच्या मुलाला बाल्कनीतून खाली फेकले अन् स्वतः उडी मारली

 


पत्नीशी भांडण झाल्यानंतर शुक्रवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला 3 मजली इमारतीच्या बाल्कनीतून खाली फेकून दिले आणि नंतर स्वतः उडी मारली. ही घटना दिल्लीतील कालकाजी भागातील आहे.

वडील आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, मानसिंग आणि त्याची पत्नी पूजा गेल्या काही महिन्यांपासून वादानंतर वेगळे राहत होते. पूजा सध्या तिच्या दोन मुलांसह कालकाजी येथे आजीच्या घरी राहत होती. काल रात्री मानसिंग पत्नी आणि मुलांना भेटायला आला असता दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर रागाच्या भरात मानसिंगने आपल्या मुलाला बाल्कनीत नेले आणि त्याला 21 फूट खाली काँक्रीटवर फेकले आणि नंतर स्वत: उडी मारली, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, रुग्णालयात दाखल केलेल्या मानसिंगची प्रकृती सध्या स्थिर आहे, तर मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मानसिंग दारूच्या नशेत असल्याचा आरोप पूजाच्या आजीने केला आहे. तसेच, पोलिसांनी सांगितले की, मानसिंगविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments