अज्ञात वाहनाने कट मारला , कापसाचा ट्रक उलटून तरुण ठार

 


अज्ञात वाहनाने कट मारल्याने कापसाचा भरलेला ट्रक रस्त्यालगत उलटल्याची घटना जळगावात घडली आहे. या अपघातात ट्रकमधील एक तरुण जागीच ठार झाला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद विदगाव रस्त्यावर हा अपघात झाला. जखमींना जळगावतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज रविंद्र अहिरे भिल असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथील ट्रक क्रमांक (एमएच 18 एए 1080) हा ट्रक मुजरासह यावल येथील डांभुर्णी येथे कापूस भरणा करण्यासाठी गेला होता. गुरुवारी 15 डिसेंबर सकाळी ट्रकमध्ये कापूस भरून परत मुंगटी येथे जाण्यासाठी निघाला होता.

दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ममुराबाद ते वीदगाव रस्त्यावरील फार्मसी कॉलेजजवळून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारला. यात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला.

या अपघातात राज रविंद्र अहिरे भिल हा तरुण जागीच ठार झाला. तर प्रमोद संभाजी पाटील (40), भरत दगडू पाटील (32), दिगंबर दिलीप पाटील (30), रविंद्र बारकू भिल अहिरे (50), जितेंद्र पवार (35), निंबा दगडू पाटील (36) आणि बुधा पाटील (60) सर्व राहणार मुंगटी ता. जि.धुळे हे गंभीर जखमी झाले आहे 

जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहे. अपघाताची घटना कळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Post a Comment

0 Comments