बहिणीची सोयरीक मोडल्याच्या वादातुन लातुरच्या औराद येथे भर चौकात एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अखिल जलील बेलुरे व बबलु महेताबसाब बागवान यांच्यात मागील दोन दिवसांपासुन बहीणीची सोयरीक मोडल्याचा वाद सुरु होता.
शनिवारी संध्याकाळी औरादच्या भर चौकातील मुख्य रस्त्यावर झालेल्या वादात एकमेकांच्या मारहाणीत एकाची हत्या तर दोघेजण जखमी झाले.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, औराद येथील अखिल जलील बेलुरे व बबलु महेताबसाब बागवान यांच्यात अखिलच्या बहिणीची सोयरीक मोडल्याच्या कारणास्तव मागील दोन दिवसांपासून वाद सुरु होते. शनिवारी संध्याकाळी 6:20 वाजता अखिल जलील बेलुरे (25) व त्याचा मित्र बबलू लायक भातांब्रे (24) हे अखिलच्या बहिणीची सोयरीक मोडल्याच्या कारणास्तव चर्चा करण्यास व जाब विचारण्यास गेले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळ विक्रीचा व्यवसाय करणारा बबलू महेताबसाब बागवान (27) याच्याकडे सायंकाळी 6:20 वाजन्याच्या दरम्यान गेले होते.
यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. बबलू बागवान याने नारळ सोलण्याच्या चाकूने अखिल बेलुरे व बबलु भातांब्रे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अखिल बेलुरे व भातंब्रे बबलु गंभीर जखमी झाले. अखिल यास पुढील उपचारासाठी निलंगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले पण यावेळी उपचारापूर्वीच निलंगा येथील डॉक्टरांनी अखिल यास मयत घोषित केले. तसेच भातांब्रे बबलू यास येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करण्यात आले. आरोपी बबलु बागवान देखील जखमी झालेला असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेची पोलीसांनी गंभीरपणे दखल घेत तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात चोख बंदोबस्त लावुन या घटनेविषयी संपूर्ण चौकशी चालु केली. यावेळी स्थळ पंचनामा करण्यात आला असून याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांनी भेट देऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिल्याचे सपोनि संदीप कामत यांनी सांगितले.
0 Comments