लग्न स्वागत सोहळ्यातील अन्नातून सुमारे 200 जणांना विषबाधा होण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज येथे उघडकीस आला आहे.
रात्री भोजन केल्यानंतर काहींना त्रास व्हायला लागला, तर अनेकांना पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाल्याने खासगी रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले होते.
दरम्यान, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल होत उपचाराअंति सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, सरांडी येथील मदन नामदेवराव ठाकरे यांच्या मुला विवाह लाखांदुर तालुक्यातील किन्ही येथे पार पडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच सरांडी येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळच्या सुमारास या कार्यक्रमात किन्ही, सरांडीसह नजीकच्या गावातील पाहुण्यांनी हजेरी लावली. मात्र, दुसऱ्या सकाळी काहींना उलटी, पोटदुखी, हगवण, मळमळीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयांत धाव घेतली. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथामिक उपचार करून त्यांना घरी सोडून दिले.
दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल होत, सर्व गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावातील सात ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचे पुढे आले आहे.
0 Comments