पाणी मागितल्याने कुऱ्हाडीने केला वार

 


शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना पाणी मागितल्याच्या कारणावरुन हाणामारी झाली. यात मानेवर कुऱ्हाडीचा घाव बसल्याने एक जण गंभीर जखमी झाला, असून, दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

याप्रकरणी शहर पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक रमेश चव्हाण, रमेश चव्हाण, प्रकाश चव्हाण (सर्व रा. सरस्वती कॉलनी, प्रभाग क्रमांक सात, श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (ता. १७) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सुमित संजय सोनवणे (रा. बेलापूर) व कृष्णा रमेश काळे, प्रशांत रामभाऊ पुजारी हे शहरातील बसस्थानकासमोरील अशोक बिर्याणी येथे जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी पिण्यास पाणी मागितल्याच्या कारणावरुन अशोक चव्हाण याने कोयत्याने कृष्णा काळे याच्या मानेवर डाव्या बाजूस व प्रशांत पुजारी याच्या डाव्या खांद्यावर वार करुन त्यांना जखमी केले. तसेच इतर दोघांनी सुमित सोनवणे याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत 'त्यांचा गेम केला. आता तुझा पण करू,' अशी धमकी दिली.

या हाणामारीत कृष्णा काळे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात, तर प्रशांत पुजारी याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुमित सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments