लग्नात आलेल्या वऱ्हाडीने केलं भयानक कृत्य

 


तुम्ही लग्नाला आलेले वऱ्हाड ऐकले असतील. पण लग्नाला आलेले पाहुणे चोर कधी ऐकलेत का? तर हो हे खरंय.

औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला आलेल्या पाहुण्यानेच लग्न घरातून तब्बल 5 लाख रुपये लांबवले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाहुणे चोराला गुन्हे शाखेने नाशिकमधून बेड्या ठोकल्या आहेत.

नातेवाईकांकडे लग्नाला आलेल्या नाशिक येथील युवकाने पुजेत नातेवाईक व्यस्त असतानाच लग्नघरातून तब्बल 5 लाख 2 हजार 500 रुपयांची ऐवज आणि सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी नवरीच्या वडिलांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक घाटात आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.

या आरोपीकडून 4 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अक्षय उर्फ आझाद राजेंद्र बिगानिया असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अक्षय हा गांधी नगर येथील नरेश रिडलॉन यांच्या मुलीच्या लग्नासाठी नाशिक वरून आलेला होता. लग्नाच्या रात्री त्याने घरातील 4 लाख 30 हजार रुपये रोख दोन तोळे सहा ग्रॅम सोन्याचे दागिने असा पाच लाखांचा ऐवज लंपास केला होता.

याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे जाऊन अक्षय याला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच अक्षय याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेऊन 2 लाख 80 हजार रोकडसह सोन्याचे दागिने, असा एकूण चार लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने हस्तगत केला. यादरम्यान आरोपी अक्षय याने दीड लाख रुपये जुगारात उडवल्याचे समोर आले आहे.


Post a Comment

0 Comments