सात लाखांचे दागिने लंपास

 


साताऱ्यातील गोडोली येथील यशवंत कॉलनीतील फ्लॅट फोडून चोरट्यांनी सात लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरुन नेली. याची तक्रार विमल बाबुराव माने (वय 56) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

गोडोली येथील यशवंत कॉलनीत विमल माने या राहण्यास आहेत. त्या कामानिमित्त दि. 10 रोजी बाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी माने यांच्या बंद फ्लॅटचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी आत प्रवेश केल्यानंतर आतील कपाटे तसेच इतर साहित्य उचकटले. चोरट्यांनी आतमध्ये असणारी सोन्याची मोहनमाळ, साखळी, ब्रेसलेट, तीन वेढणी, एक नेकलेस, दोन बांगड्या, एक गंठण, कर्णफुले तसेच वेल व 30 हजारांची रोकड असा सुमारे 7 लाख 10 हजारांचा ऐवज चोरुन नेला. दि. 11 रोजी दुपारी माने यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी घरी जावून पाहणी केली असता त्यांना चोरट्यांनी आतील सोन्याचे दागिने तसेच रोकड चोरुन नेल्याचे दिसले.

याबाबतची तक्रार विमल माने यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. घटनास्थळाची पाहणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी करत तपासाच्या सुचना सातारा शहर पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या. या घरफोडीचा तपास उपनिरीक्षक डी. डी. मुसळे हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments