आळंदी देवस्थान विश्वस्तांच्या ३ जागांसाठी ७५ अर्ज ; विविध क्षेत्रातील नामवंत इच्छुक..


आळंदी : आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदावरील डॉ.अभय टिळक आणि डॉ.नरेंद्र वैद्य यांचा कार्यकाल संपल्याने पदमुक्त झाले आहेत. त्यामुळे आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदावर सध्या सहा पैकी तीनच विश्वस्त कार्यरत आहेत. उर्वरित रिक्त ३ जागांवर जिल्हा न्यायालयांतर्गत होणाऱ्या नेमणूकांसाठी सुमारे ७५ हून अधिक अर्ज आले. अनेक इच्छुक नेमणुकीसाठीच्या पुढील कार्यवाहीकडे डोळे लावून आहेत.

आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदाचा कालावधी सात वर्षांचा असून जिल्हा न्यायालयाकडून नेमणुका केल्या जातात. यापूर्वी डॉ.अजित कुलकर्णी हे गेली दोन वर्षांपासून पदमुक्त झाले. त्यांच्या जागेवर विश्वस्त नेमणूक झाली नसल्याने जागा रिक्तच आहे. या रिक्त विश्वस्त पदासाठी आळंदी देवस्थानने आलेल्या अर्जापैकी शिफारस प्रस्ताव यापूर्वीच सादर केले होते. मात्र जिल्हा न्यायालयाकडून नेमणुक केली नसल्याने ही जागा दोन वर्षापासून रिक्तच आहे. आता डॉ.अभय टिळक, डॉ.नरेंद्र वैद्य यांच्या दोन आणि पूर्वीची एक अशा तीन जागा रिकाम्या झाल्या असून या जागांसाठी अर्ज मागविले. आतापर्यंत सुमारे ७५ अर्ज आले आहेत. त्यामुळे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अॅड विकास ढगे, लक्ष्मीकांत देशमुख तिघे जण पुढील कार्यवाही होईपर्यंत विश्वस्त पदावर काम करत राहतील.

तसेच १६ मे २०२३ रोजी उर्वरित तीन विश्वस्तांचाही कार्यकाल संपत आहे. त्यामुळे रिक्त जागांवर नेमणुका करणे गरजेचे झाले आहे.


उर्वरित रिक्त जागांवर नेमणुका कधी होणार याची इच्छुकांना प्रतिक्षा आहे. आपलीच वर्णी आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदावर राहावी. यासाठी विविध क्षेत्रातील अनेक नामवंत इच्छुक प्रयत्नात आहेत. आलेल्या अर्जातून अर्जदारांची मुलाखत घेऊन न्यायालयाकडे नेमणुकीसाठी नावे पाठवली जातील. पुढील महिन्यात मुलाखती होतील. विश्वस्त नेमणुकाबाबत लवकरात-लवकर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसा प्रयत्न आम्ही करत आहोत.


- *योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त, आळंदी देवस्थान* 


*सुधारणांची गरज* 


वारकऱ्यांचा,भाविकांचा ओढा आळंदी देवस्थानकडे वाढत आहे. या तुलनेत देवस्थानला खूप मोठे योगदान देत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.आळंदीतील संत जलाराम बाप्पा, संत गजानन महाराज मंदिराने चांगल्या सोयस-विधा भाविकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. याप्रमाणेच आळंदी देवस्थानला चांगल्या सुविधा, स्वच्छतेस महत्व द्यावे लागेल. देवस्थानच्या ३०० एकरहुन अधिक गायरानातील जागेतही विविध प्रकल्पास लवकरच सुरूवात करावी लागेल. मंदीर सुधारणा आणि देऊळवाड्याच्या भिंतीलगतचे अतिक्रमण, भक्तनिवास व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे

Post a Comment

0 Comments