संपत्तीचा वादातून बॅटने मारहाण करत आईला संपवलं

 


संपत्तीच्या वादात पोटच्या पोराने वृद्ध आईला बेसबॉल बॅटने मारहाण करत संपविले. त्यानंतर तिचा मृतदेह खोक्यामध्ये भरून नोकराच्या मदतीने रायगडच्या दरीत नेऊन फेकला. वीणा गोवर्धनदास कपूर (७४) असे मयत महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी जुहू पोलिसांनी त्यांचा धाकटा मुलगा सचिन कपूर आणि नोकर छोटू ऊर्फ लालकुमार मंडह यांना अटक केली आहे.

जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास जुहूच्या गुलमोहर रोड क्रमांक ५ येथील गरीबदास सोसायटीमध्ये (कल्पतरू सोसायटी) राहणाऱ्या वीणा या हरवल्या असल्याची तक्रार सिक्युरिटी सुपयवायझर म्हणून काम करणारे जावेद अब्दुला मापारी यांनी केली. त्यानुसार हरवल्याची तक्रार ७ डिसेंबर रोजी दाखल करत जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवार, उपनिरीक्षक नरवडे यांनी तपास सुरू करत घटनास्थळी धाव घेतली.

चौकशीदरम्यान मापारी यांनी पोलिसांना सांगितले की, वीणा यांचा मोठा मुलगा अमेरिकेत स्थायिक असून त्या धाकटा मुलगा सचिन याच्यासोबत राहतात. मात्र त्यांच्यात संपत्तीवरून सतत वाद होत असून हे प्रकरण कोर्टात गेल्याचेही पोलिसांना समजले. तेव्हा संशय आल्याने पोलिसांनी वीणा व सचिन यांचे मोबाईल लोकेशन तपासले. तेव्हा वीणा यांचे जुहू तर सचिन याचे लोकेशन पनवेल दाखवले. त्यानंतर सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ७ डिसेंबरला सकाळी ७ वाजता सचिन आणि छोटू ऊर्फ लालकुमार मंडह हे माउली इमारतीच्या फ्लॅट २०३ मध्ये आल्याचे आढळले.

दोघांनाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले असता सचिनचे त्याची आई वीणा यांच्याशी संपत्तीच्या वादातून भांडण झाले आणि त्याने हाताने व बेसबॉल बॅटने मारहाण करून त्यांची हत्या केल्याचे कबूल केले. तसेच नोकर छोटू याच्या मदतीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वीणा यांचा मृतदेह एका मोठ्या खोक्यामध्ये भरून रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे दरीमध्ये फेकल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर भादंवि कलम ३०२, २०१, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments