पंतगीचा वादातून केले चाकूने वार

 


पंतग उडविणाऱ्या युवकाला शिवीगाळ केल्याने २१ वर्षीय युवकाने कुख्यात गुन्हेगाराचा चाकूने सपासप वार करीत खून केला. ही घटना मंगळवारी (ता.२७) सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास बेलीशॉप रेल्वे क्वार्टर परिसरात घडली.

शंकर राजू कोतूलवार (वय ४२ रा. भिलगाव) असे मृताचे नाव असून लोकेश गुप्ता (वय २१ रा. मोतीबाग रेल्वे क्वार्टर) असे आरोपी युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकरवर २२ गुन्हे दाखल असून त्याच्यावर तडीपारीचीही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान त्यातून नुकताच सुटून तो आला होता.

आज दुपारच्या सुमारास तो बेलीशॉप येथे वास्तव्यास असलेली आई लक्ष्मी राजू कोतूलवार आणि बहिण गायत्री यांची भेट घेण्याकरिता आला होता. दरम्यान सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास तो दारू पिऊन असताना, त्याने परिसरात पतंग उडविणाऱ्या लोकेश यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकेशला राग आला. त्याने रागाच्या भारात घरातून चाकू आणून शंकरवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.

काही वेळातच त्याने शंकरला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळाताच, त्यांनी घटनास्थळी ताफ्यासह दाखल होत, आरोपीला ताब्यात घेतले. याशिवाय शंकरचा मृतदेह रुग्णालयात हरविला. यावेळी पोलिसांनी लोकेशवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

Post a Comment

0 Comments