घरात घुसून चोरी, 1.17 लाख रूपये किंमतीची रोख रक्कम जप्त

 भोलाराम चौधरी, वय 59 वर्षे, रा. सुदर्शन नगर, साने चौक, आकुर्डी- चिखली रोड, चिखली यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की 8 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता ते दुपारी 3:30 वाजता दरम्यान कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाची कडी उघडून त्या वाटे आत प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातील तीन लाख रुपये रोख रक्कम चोरी करून नेली होती. याबाबत चिखली पोलीस ठाण्यामध्ये भा.द.वि कलम 454,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा उघड करण्यासंदर्भात वसंतराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या तपासकातील सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

गुमाने यांनी अंमलदार यांच्यासह तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनास्थळाच्या आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली व आसपासच्या लोकांकडे विचारपूस सुरू केली. तेव्हा आसपासच्या लोकांकडून तसेच सीसीटीव्ही फुटेज मधून एक काळ्या रंगाच्या होंडा डिओ मोटरसायकल वरून एक अनोळखी महिला तिच्या तोंडाला पांढऱ्या रंगाचा स्कार्फ बांधून संशयितरित्या येत असल्याचे लक्षात आले.

त्यामुळे गुमाने आणि तपास पथकातील अंमलदार यांनी त्या संशयित महिलेचा शोध सुरू केला व बातमीदार नेमून त्या संशयित महिलेबाबत बातमी मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला.तेव्हा अंमलदार पोलीस नाईक सुरेश सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, त्या वर्णनाची एक महिला एका काळ्या रंगाच्या डिओ गाडीवरून घरकुल परिसरामध्ये आलेली आहे.

अशी बातमी मिळाल्यानंतर गुमाने व अंमलदार यांनी तात्काळ घरकुल परिसरामध्ये पेट्रोलिंग सुरू केली व त्या दरम्यान ती संसद महिला दिसली. तेव्हा त्या महिलेस महिला पोलीस अंमलदार च्या मदतीने ताब्यात घेऊन तिच्या कडे नाव पत्ता विचारले असता तिचे वय 35 वर्षे असून ती चिंचवड येथे राहत असल्याचे सांगितले.

त्या महिलेस चिखली पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडे गुन्ह्याच्या बाबतीत अधिक तपास केला तेव्हा तिनेच हा गुन्हा केल्याचे कबूल केले.  तिच्या ताब्यातून 1.17 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच तिने हा गुन्हा करताना वापरलेली काळ्या रंगाची होंडा डियो गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे.

या महिलेवर यापूर्वी पिंपरी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 380, 511 तसेच वाकड पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम 380 हे गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments