खुनाचा बदला घेण्यासाठी गर्दीमध्ये गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

 


प्रथमेश उर्फ गणेश गोपाळ यमुल (वय 22 रा.नाना पेठ पुणे) व त्याचा साथीदार रुपेश राजेंद्र जाधव (वय 24 रा.कुंभारवाडा, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्चस्ववादातून 26 जुलै 2022 रोजी रात्री नाना पेठ  येथे अक्षय वल्लाळ याचा किशोर शिंदे व महेश बुरा यांनी घरात घुसून चाकुने वार करत खून केला होता. याच खूनाचा बदला म्हणून 27 डिसेंबर रोजी वल्लाळ याचा मावस भाऊ कृष्ण गाजुल व त्याच्या साथीदारांनी किशोरचा भाऊ शेखर शिंदे याच्यावर रामेश्वर चौकात सायंकाळी गर्दीच्या वेळी गोळीबार करत खून करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या प्रकरणीतील काही आरोपींना अटक केली होती, मात्र अन्य आरोपी व गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्याचा पोलीस प्रयत्न करत होता.

यावेळी गुन्हे शाखा एकचे पोलीस अमंलदार अमोल पवार व अजय थोरात यांना बातमीदारामार्फत खबर मिळाली की, गुन्ह्यातील मुख्य आरोपी रुपेश जाधव व गणेश यमुल हे कोंढवा  येथे लपून बसले आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला असता आरोपी हे दुचाकीवरून शत्रुंजय रोडवरून येताना दिसले, पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता आरोपी न थांबता तसेच पुढे गेलो. पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.

यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 70 हजार रुपायांची दुचाकी, व देशी बनावटीची 40 हजार रुपायांची पिस्टल असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी अक्षयच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शेखर शिंदे याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यातील आरोपींवर फरसखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला.

ही कारवाई गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस अमंलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान खान, आय्याज दड्डीकर, दत्ता सोनावणे, विठ्ठल साळुंखे, महेश बांमगुडे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, शुभम देसाई, तुषार माळवदकर यांनी केली.

Post a Comment

0 Comments