रेल्वे खात्यात, आयकर विभागात, भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे देऊन २४ युवकांची १ कोटी ४३ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी क्रांती कुमार पाटील (रा. फुलेवाडी, ता.करवीर), मोहम्मद कामील अब्दुल गफार (वय ४१, सध्या रा. कुर्ला मंबई, मुळ रा. प्लॉट नं. १४ नुरी मशिद जवळ जाफर नगर नागपूर), अनिस खान गुलाम रसुलखान (वय ४६ रा. १३७ काटोल रोड,) गोटिक खान (कटोलोड) नागपूर), रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग (कोलकत्ता), सुबोधकुमार (कलकत्ता) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून दाम दुपटीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता नोकर भरतीचे आमिष दाखवून एका महिलेसह ५ भामट्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील युवक व पालकांना १ कोटी ४३ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार कुरुंदवाड शहरात उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या युवकांनी भामट्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावर पैसे पाठवले आहेत. या सर्व बँकेच्या नोंदी तक्रारी सोबत सादर केल्या आहेत. याबाबत आयकर विभागातून माहिती घेण्यात आली आहे. ही फसवणूक झाली असून आर्थिक गुन्हे अन्वेषणने केलेल्या पडताळणी आणि जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सपोनि बालाजी भांगे यांनी दिली.
फिर्यादी आनंदा करडे यांच्या एका मुलाला आयकर विभाग दिल्ली येथे तर दुसऱ्या मुलाला आर्मीत भरती करतो, असे सुबोधकुमारने सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पंधरा लाख रुपये घेतले. करडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आर्मीत ३५ मुलांची बॅच पाठवायची आहे. आणखी मुले असतील तर घेऊन या, असे आमिष दाखवल्याने जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोळ कुरुंदवाड येथील २४ युवकांच्या पालकांनी सुबोधकुमार याच्या मागणीनुसार लाखो रुपये त्याच्या खात्यावर जमा केले.
या युवकांना सुबोधकुमारने ट्रेनिंगसाठी कलकत्ता येथील कमांडर हॉस्पिटल येथे उपस्थित करून विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या व पोस्टाने तुम्हाला पत्र येईल, असे सांगून लावून दिले. पालकांचा सुबोध कुमार याच्याशी फोनवरून संपर्क सुरू होता. मात्र २५ जुलै २०२२ पासून सुबोध कुमारचा फोन बंद आहे. त्याच्याशी पालकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या युवक व पालकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments