बिहारमध्ये चक्क मोबाईल टॉवरच गेला चोरीला , तीन दिवस चालली चोरी

 


बिहारमध्ये काही चोरट्यांनी संपूर्ण मोबाईल टॉवर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरांनी हळुहळू टॉवर तोडला आणि सर्व लोखंड गोळा करुन नेले.

आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा टॉवर चोरीला कसा काय गेला आणि कोणालाच कळले कसे नाही? ही घटना पाटना जिल्ह्यातील गार्डनीबाग भागात घडली आहे. 

त्याचे झाले असे की या चोरांनी मोबाईल कंपनीचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे भासवून आले होते. तीन दिवस हळू हळू करुन त्यांनी संपूर्ण टॉवरच गायब केला. हे चोर लोकांना कंपनीचे लोक वाटले आणि अत्यंत कष्टाने कमी वेळेत त्यांनी काम संपवल्याने त्यांनी लोकांकडून कामाची पावती सुद्धा मिळवली. 

लल्लन सिंग नावाच्या व्यक्तीच्या जमिनीवर जीटीपीएल कंपनीचा टॉवर उभारण्यात आला होता. एके दिवशी 10 जण येथे आले आणि त्यांनी स्वतःला टॉवर कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे सर्वांना सांगितले. 

यावेळी लल्लन सिंग यांचे शेजारी मनोज सिंग सांगितले की, “त्यांनी सांगितले की कंपनी तोट्यात आहे आणि ती काही दिवसात बंद होणार आहे, त्यामुळे हा टॉवर काढावा लागेल.” याच बरोबर जमिनीचे मालक लल्लन सिंग यांनी टॉवर हटवण्यास होकार दिला. त्यांना वाटले की जमीन रिकामी होईल. 

सलग तीन दिवस दहा आरोपींनी टॉवर गॅस कटरने कापला आणि पिकअप व्हॅनमध्ये तुकडे भरुन गेले. हे टॉवर सुमारे 50 मीटर उंच असल्याचे सांगण्यात येत आहे, जो 15-16 वर्षांपूर्वी येथे बसवण्यात आला होता. टॉवरची किंमत 19 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक लोकांनी सांगितले, “सलग तीन दिवस, आम्ही ज्या मार्गावरून चोर टॉवरचे तुकडे घेऊन जात होते, त्याच मार्गावरुन ये – जा करीत होतो, पण आम्हाला वाटले की ते कंपनीचेच लोक आहेत, त्यामुळे त्यांना कोणीही अडवले नाही.”

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतूनही मोबाईल टॉवर चोरीचे असेच प्रकरण समोर आले होते. या वर्षी जुलैमध्ये एका टोळीतील तीन जण बनावट कागदपत्रांसह मोबाईल कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवत मोबाईल टॉवर तोडून तो भंगार विक्रेत्याला ६ लाख ४० हजार रुपयांना विकला. त्या आरोपींकडून 10 टन लोखंड आणि एक जनरेटर जप्त करण्यात आला होते. तसेच काही दिवसांपुर्वी बिहार मधून चोरांनी रेल्वे इंजनच चोरले होते. तर बिहारमधून रेल्वे पूल सुद्धा चोरीला गेला आहे. त्यामुळे बिहारमधून काय काय चोरीला जाईला याचा नेम नाही.

Post a Comment

0 Comments