बहिणीला सासरी सोडायला आलेला भाऊ जिवंत घरी परतलाच नाही

 


नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावर एका तरुणाचा बेशुद्ध अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

मृतदेह गणेश पंजाब पठाडे या तरुणाचा असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मूळचा हिंगोलीतील असलेला गणेश हा आपल्या बहिणीला सासरी सोडायला नाशिकला आला होता. पण बहिणीला सोडून पुन्हा माघारी परतत असताना अचानक त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, याचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

प्राथमिक तपासात, 26 वर्षीय गणेश पंजाब पठाडे (राहणार शिरसम, जिल्हा हिंगोली) याच्या मृत्यूचं कारण अमानुष मारहाण असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. मात्र त्याला मारहाण कुणी केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

गणेश पठाडे हा त्याची बहीण प्रज्ञा कांबळेला सासरी सोडण्यासाठी नाशिकला आला होता. सकाळी नाश्ता करुन झाल्यानंतर गणेशला त्याच्या मोबाईलवर एक फोन आला होता. फोनवर बोलत बोलत तो घराबाहेर पडला. पण नंतर पुन्हा घरी जिवंत परतलाच नाही. त्यामुळे खळबळ उडाली.

बहीण प्रज्ञा हीने भाऊ गणेशला मोबाईलवर संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर संध्याकाळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments