वडीलाचा खून, मुलगा अटकेत

 


शेतजमीन नावावर का करत नाहीत?' असे म्हणून डोक्यात दगड, बकेट मारून मुलाने वडिलांचा खून केला होता. संशयित आरोपी सहा महिन्यांपासून फरार होता. त्याला ग्रामीण पोलिसांनी रविवारी शिक्रापूर (जिल्हा पुणे) येथे शिताफीने पकडले.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी ः शाहू पिराजी शिंदे (वय, ७० वर्ष, रा. तालखेड) यांना चार मुले आहेत. तिघेजण मुंबई येथे राहतात. यातील संतोष शाहू शिंदे हा वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन माझ्या नावावर का करत नाहीत यासाठी सतत भांडत होता. पाच जून २०२२ ला शाहू शिंदे हे शेतात असताना संतोष हा शेतात गेला. त्याने वरील कारणावरून भांडण केले.

त्यानंतर वडील शाहू यांच्या डोक्यात दगड, बकेट मारून जखमी केले. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान त्यांचा १४ जूनला मृत्यू झाला. मयताची पत्नी राजूबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरून संतोष याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मागील सहा महिन्यांपासून फरार असलेला संतोष शिक्रापूर येथे एका कंपनीत काम करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश इधाटे, पोलिस कर्मचारी विलास खराडे, महेंद्र सांगळे हे रविवारी शिक्रापूर येथे गेले. एका दुकानात दारू विकत घेण्यासाठी आलेल्या संतोषला त्यांनी शिताफीने पकडून ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

Post a Comment

0 Comments