प्रेमप्रकरणातून तरुणावर गोळीबार

 


मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार फाटा कण्हेर येथे प्रेमप्रकरणातून एका तरुणाला मारहाण करून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे 

याप्रकरणी मांडवी पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, आर्म्स ऍक्ट, मारहाण कलमानव्ये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

नायगावच्या जूचंद्र गावात गावातील वामन हाऊसमध्ये राहणाऱ्या अक्षय पाटील (२४) या तरुणावर प्रेमप्रकरणातून फायरिंग झाल्याने गावात खळबळ माजली आहे. अक्षय पाटील आणि विरारच्या फाटा खार्डी येथे राहणाऱ्या आरोपी विकी पाटील यांच्यात प्रेम प्रकरणावरून वाद होता. अक्षयच्या होणाऱ्या पत्नीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे त्याने आरोपीला फोनवर विचारणा केल्यावर आरोपीने त्याला भेटण्याचे बहाण्याने बोलावले. अक्षय मित्रांसोबत शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास विरार फाटा येथील कण्हेर येथे आला. त्यावेळी आरोपी विकी पाटील आणि त्याच्या सोबतच्या दोघां मित्रांनी अक्षयला धातू फायटर व ठोशाबुक्यांनी डोके, चेहऱ्यावर, हात, छातीवर बेदम मारहाण केली आहे.

यावेळी अक्षयच्या अंगावर दुसऱ्या आरोपीने बंदूक रोखून हवेत गोळीबार केला व तिन्ही आरोपी कारने पळून गेले. मांडवी पोलिसांनी या प्रकरणी विकी पाटील यांच्यासह दोघांना अटक केली आहे. शनिवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.Post a Comment

0 Comments