शेतात एकटीच काम करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार

 


स्वमालकीच्या शेतात सायंकाळी उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना गडचिराेली तालुक्याच्या अमिर्झा टाेली येथे शनिवार १२ ऑक्टाेबर राेजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

मंदा संताेष खाटे (३६) रा. अमिर्झा टाेली, असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे.

मंदा खाटे ही महिला शनिवारी सकाळी ११ वाजता स्वमालकीच्या शेतात धान कापणीसाठी इतर महिला मजूर घेऊन गेली हाेती. मजुरांसाेबत दिवसभर धान कापणी केल्यानंतर सायंकाळी तिने इतर महिलांना सुट्टी देत त्यांना घरी जाण्यास सांगितले व स्वत: बांधीच्या पाळीवरील उडीद कापून येते, असे सांगून शेतात थांबली. खाटे यांचे शेत जंगलाला अगदी लागून आहे. मंदाबाई एकटीच उडीद कापत असतानाच वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला व शेतातून जवळपास १०० मीटर अंतरावर फरफटत नेले.

दरम्यान वाघाने महिलेचा डावापाय फस्त केला. सायंकाळ हाेऊनही मंदाबाई घरी का परतली नाही, याबाबत कुटुंबीयांनी इतर महिलांना विचारणा केली व शेतीच्या दिशने ते काही लाेकांसाेबत निघाले. दरम्यान शेतीच्या कुंपणावर अंतर्वस्त्र आढळले. बांगळ्या फुटलेल्या आढळल्या. तेव्हा वाघाचा हल्ला झाला असावा, याची कुणकुण लागली. याचवेळी माेठ्या प्रमाणात लाेकांना बाेलावून परिसरात शाेध घेतला असता मंदाबाईचा मृतदेह आढळला. महिलेच्या पश्चात पती व दाेन मुले आहेत.


Post a Comment

0 Comments